- राज्य
- छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत
छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत
मोदी, फडणवीस यांनी जातीय, धार्मिक फाळणीची स्थिती निर्माण केल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
छगन भुजबळ यांना अजित पवारांनी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीपद दिले आहे. हे पद केवळ ओबीसी असल्यामुळे त्यांना मिळाले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात आणि राज्यात जाती धर्माचे राजकारण करून फाळणीची परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेना मराठे, ओबीसी यांच्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत नाही. आम्ही या सर्वांकडे मराठी माणूस म्हणून बघतो. त्यांच्यात भेदभाव करत नाही. संपूर्ण मराठी माणूस संघटित करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या समस्या सुटल्या पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भारतीय जनता पक्ष मात्र जाती आणि धर्माचे राजकारण करून देशभरात विद्वेष निर्माण केला आहे.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले तरी देखील ते स्वतः ला ओबीसी नेतेच समजतात. आज पर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी मै ओबीसी नेता हूँ, असे सांगितले आहे काय, असा सवाल संजय राऊत यांनी केला. छगन भुजबळ हे ओबीसी असल्यामुळेच मोदी यांनी त्यांना मंत्रिपद दिले. खुद्द अजित पवार यांना देखील त्याची कल्पना नव्हती, असे राऊत म्हणाले.