लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन
केवळ 38 व्या वर्षी कर्करोगाने घेतला बळी
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी, मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी झुंजताना रविवारी पहाटे चार वाजता निधन झाले. त्या केवळ 38 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे आई आणि पती शंतनू मोघे असा परिवार आहे.
मागील एक वर्षापासून प्रिया कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र, ही झुंज यशस्वी ठरली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मराठी मनोरंजन क्षेत्रात आपल्या चतुरस्त्र आणि दर्जेदार अभिनयाने अल्पकाळातच आपले स्थान निर्माण करणाऱ्या प्रिया यांच्या अकाली निधनाने मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रिया यांचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाणे येथे झाला. सन 2006 मध्ये या सुखांनो या, या मालिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मागील पिढीतील दमदार अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र आणि अभिनेते शंतनू मोघे हे प्रिया यांचे पती होत.
'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' इत्यादी मालिकांमध्ये प्रिया यांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या.. आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 2016 साली प्रदर्शित झालेल्या 'विघ्नहर्ता महागणपती' तसेच याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.