'... तर निर्माण होईल समाजाची फसवणूक झाल्याची भावना'

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

'... तर निर्माण होईल समाजाची फसवणूक झाल्याची भावना'

मुंबई: प्रतिनिधी

मराठा समाजाला सरसकट इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, यापूर्वीचे न्यायालयाचे काही निकाल या मागणीच्या विरोधात जाणार असून चौकटीच्या बाहेर जाऊन असा निर्णय घेता येणार नाही. घेतलाच तर तो न्यायालयात टिकणार नाही आणि समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करूनच अमलात आणावी लागणार आहे. त्यासाठी आपण 

न्या. संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमुळे अनेक मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याची जबाबदारी आपण याच न्या. शिंदे यांच्यावर सोपवली आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागणार आहे. तरीही आरक्षण आत्ताच मिळावे असा जरांगे पाटील यांचा आग्रह आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. 

हे पण वाचा  आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा

ही सर्व प्रक्रिया काय आहे, हे स्वतः न्या. शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांना सांगितले. या प्रक्रिया न करता आरक्षणाचा निर्णय घेतला तर तो निरर्थक ठरेल. सर्वांनी चर्चा केली, विषय समजून घेऊन एकमेकांना प्रतिसाद दिला तरच कायमस्वरूपी उपाय करता येईल, असेही फडणवीस म्हणाले. 

उपहास सहन करणे आणि शिव्या खाणे याची मला सवय

जरांगे पाटील हे सातत्याने फडणवीस यांच्यावरती टीका करत असून त्यात अनेकदा सभ्यतेची मर्यादा ओलांडली गेली आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, उपहास सहन करणे आणि शिव्या खाणे याची मला सवय आहे. माणसाची ओळख आणि आठवण शेवटी त्याच्या कर्तृत्वामुळे निर्माण होत असते. मला कोणी कितीही शिव्या दिल्या तरी देखील जे समाजाच्या हिताचे आहे आणि जे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या चौकटीत मान्य केलेले आहे तेच मी करणार, असेही फडणवीस म्हणाले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt