- राज्य
- 'मराठा आंदोलकांना सुविधा देणे ही आपली जबाबदारी'
'मराठा आंदोलकांना सुविधा देणे ही आपली जबाबदारी'
मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मुंबईत आलेले मराठा बांधव आपलेच असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नमूद केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांना जेवण खाण, पाणी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे आवाहन अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
मुंबईत आलेले आंदोलन हे आपलेच आहेत. त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. ते कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरातील असतील तरीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्यापैकी बहुतेक जण राज्याच्या विविध भागात छोट्याशा जमिनीवर शेती करून आपली गुजराण करणारे आहेत. शेतकरी शेतमजूर आहेत. शिक्षणासाठी धडपडणारे विद्यार्थी आहेत. हे सगळे लोक आपलेच आहेत, असे अमित ठाकरे यांनी नमूद केले आहे.
कालच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे हलक्या कानाचे आणि मानासाठी भुकेलेले आहेत, अशा शब्दात त्यांची संभावना केली होती. भारतीय जनता पक्षाची री ओढण्याचे सोडून द्या. त्यांनीच तुमच्या मुलाला विधानसभा निवडणुकीत पाडले, असा सल्लाही दिला होता. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केलेले आवाहन उल्लेखनीय आहे.