- राज्य
- 'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही'
'जरांगे द्विधा मन:स्थितीत, मागणीत स्पष्टता नाही'
ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची टीका
नागपूर: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे स्वतःच द्विधा मनस्थितीत असून त्यांच्या मागण्या रोज बदलत असतात. त्यांच्या मागण्यांमध्ये स्पष्टता नाही, अशी टीका इतर मागासवर्गीयांचे नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या नियोजित अध्यादेशातून सरसकट हा शब्द वगळण्यास जरांगे पाटील यांनी मान्यता दिली आहे. त्यांच्या भूमिकेचे स्वागत तायवाडे यांनी केले आहे. आम्ही पूर्वीपासून हेच म्हणत होतो, असा दावा त्यांनी केला.
ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. मात्र, आतापर्यंत सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून इतर मागास प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्याला आमचा विरोध आहे, असे तायडे म्हणाले.
एकीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे नागपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ओबीसी आरक्षण बचाव, असा नारा देत साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी या गावातच ओबीसी समाजाचे उपोषण सुरू होणार आहे.
सरकारने आमच्याकडून 13 महिन्यापूर्वीच कागदपत्र घेतली आहेत. आता आम्ही कोणतीही कागदपत्र देणार नाही. कुणबी ही मराठा समाजाची पोट जात असल्याचे कायदा सांगतो. सातारा गॅझेट मध्ये मराठा हे कुणबी असल्याचे नमूद केले आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये मराठवाड्यातील सर्व मराठे समाविष्ट होतात. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारला कोणताही अडथळा येण्याचे कारण नाही, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.