'तुम्ही दहा टक्क्यांना घाबरत असाल तर आमच्याकडे...'
प्रा लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला दिला कडक इशारा
सोलापूर: प्रतिनिधी
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार जर दहा टक्के मराठा समाजाला घाबरत असेल तर आमच्याकडे ५० टक्के इतर मागासवर्गीय समाज आहे, असा इशारा ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलकांना दिलेला शासन आदेश हा सरकारच्या मानगुटीवर बसून घेतलेला कागदाचा तुकडा आहे. मात्र, त्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आपण न्यायालयीन लढा तर लढूच आणि रस्त्यावर उतरून आपली ताकदही दाखवू. आम्ही गावगाड्यात जाऊ. त्यांचा आवाज बनू. आपण ५० टक्के आहोत. या खासदार, आमदारांची पळताभुई थोडी करू. आपले आमदारांनी खासदार सभागृहात पाठवू, असेही प्रा हाके म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना समजवा...
ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी रस्त्यावरची लढाई आम्ही लढू. तुम्ही मंत्रिमंडळात राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपली बाजू समजावून सांगा, असे आवाहन प्रा हाके यांनी ज्यष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना केले. भुजबळ हे तोंड दाबून गप्प राहणारे नाहीत. ते जेव्हा उसळून उठतील तेव्हा महाराष्ट्राचे चित्र बदललेले असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोपीचंद पडळकर हे आपले सहकार्य असून त्यांनी देखील या चळवळीत कोणत्याही दबावाखाली न येता सहभागी व्हावे, असे आवाहन हाके यांनी केले.
... तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव नका घेऊ
अजित पवार यांना कारखाने चालवण्याशिवाय दुसरे काही जमत नाही. खरे तर ते पोल्ट्रीवरचे काम कामगार शोभतात. केंद्रीय लोकसभा आयोगाची परीक्षा देऊन आलेल्या अधिकाऱ्यांना दमदाटी करणे योग्य नाही. तुमची भाषा सुधारा. ते जमत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव नका घेऊ. घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वगैरे तुम्हाला काही पेरणार नाही. ती तुमची पात्रता नाही, अशा कठोर शब्दात प्रा लक्ष्मण हाके यांनी पवार यांच्यावर टीका केली. त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमित मिटकरी यांच्यावर देखील त्यांनी अस्सल ग्रामीण भाषेत आगपाखड केली.