- राज्य
- दीर्घ आजाराला कंटाळून वृद्धाने केली पत्नीची हत्या
दीर्घ आजाराला कंटाळून वृद्धाने केली पत्नीची हत्या
स्वतःला संपविण्याचा प्रयत्न फसला
पालघर: प्रतिनिधी
सध्याच्या काळात दीर्घायुष्य हे वरदान नसून शाप असल्याचे सिद्ध करणारी घटना वसई येथे घडली आहे. आपल्या आजारपणामुळे मुला सुनेला मोकळेपणाने जगता येत नाही, ही खंत उराशी बाळगत ८२ वर्षाच्या आजोबांनी आपल्या ७४ वर्षांच्या पत्नीची हत्या करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला.
वसई पश्चिम कराडीवाडी येथे राहणाऱ्या अर्पिना गॅब्रिएल परेरा आणि पती गॅब्रिएल फ्रान्सिस परेरा यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. या दांपत्याचा मुलगा ब्रुनो,त्यांची पत्नी आणि मुलगी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले असता गॅब्रिएल यांनी घरातील सुरीने गळा चिरून अर्पिना यांचा खून केला. स्वतःच्या गळा, हात आणि पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्नही केला.
रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ब्रुनो व अन्य कुटुंबीय घरी परतले असता त्यांनी या दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्वरित रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अर्पिना यांना मृत घोषित केले तर गॅब्रिएल यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अर्पिना यांना दीर्घ काळापासून दम्याचा आजार होता. तसेच इतर गंभीर विकारांनी त्या व्हील चेअरवर होत्या. गॅब्रिएल हे देखील गंभीर आजारांनी त्रस्त होते. आपले जगणे मुलावर ओझे होत असल्याच्या भावनेतून गॅब्रिएल यांनी हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.