- देश-विदेश
- रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला! तब्बल 800 ड्रोन्स डागले
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला! तब्बल 800 ड्रोन्स डागले
अनेक इमारती उद्धवस्त; दोघांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेन युद्ध पुन्हा भडकलं आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच एक धक्कादायक माहिती दिली आहे. रशियाने राजधानी कीव शहरावर मोठ्या संख्येने ड्रोन आणि मिसाइलने हल्ले केले. या हल्ल्यांत दोन लोकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा रशियाचा युक्रेनवरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. रशियाने थोडथोडके नाही तर तब्बल 805 ड्रोन्सने युक्रेनवर हल्ला केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या हल्ल्यानंतर युक्रेनमधील एका सरकारी इमारतीच्या (Russia Big Attack on Ukraine) छतावरून धुराचे लोट दिसत होते. युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनाट यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला. युक्रेनविरोधात युद्ध सुरू झाल्यापासूनचा (Russia Ukraine War) हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात ड्रोनबरोबरच विविध प्रकारच्या 13 मिसाइलही डागण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यातील 747 रशियन ड्रोन आणि चार मिसाइल निकामी करण्यात आल्या. रविवारपर्यंत युक्रेनमधील 37 ठिकाणी 9 मिसाइल आणि 56 ड्रोन हल्ले झाले.
मंत्रिमंडळाच्या मुख्यालयावरही हल्ला
एसोसिएटेड प्रेसनुसार एका सरकारी इमारतीच्या छतावरून धुराचे लोट दिसत आहेत. हा धूर कोणत्या कारणामुळे पसरला याची खात्रीशीर माहिती मात्र मिळालेली नाही. जर एखाद्या हल्ला झाल्याने धूर झाला असेल तर तो हल्ला रशियानेच केलेला असावा. कारण रशियाने याआधीही सरकारी इमारतींवर हल्ले केले आहेत. ही इमारत युक्रेनच्या मंत्रिमंडळाचे मुख्यालय आहे. या इमारतीत मंत्र्यांची कार्यालये आहेत. अग्निशमन वाहने आणि पोलीस आल्यानंतर इमारतीत प्रवेश बंद करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
युक्रेनच्या पंतप्रधान यूलिया स्विरीडेंको यांनी सांगितले की शत्रूच्या हल्ल्यात पहिल्यांदा सरकारी इमारतीचे नुकसान झाले आहे. आम्ही इमारती पुन्हा बांधू. पण जे जीव गेले आहेत त्यांना परत आणता येणार नाही. कीव शहराचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले की रशियाच्या ड्रोनचा कचरा स्वियातोशिन्स्कीमधील इमारत आणि डार्नित्स्कीमधील इमारतीवर पडला. यामुळे या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, ज्यावेळी युरोपीय नेत्यांनी युद्ध समाप्त करण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर दबाव वाढवला आहे. नेमक्या त्याच वेळी हा सर्वात मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे युद्ध थांबवण्याच्या युरोपीय देशांच्या आणि अमेरिकेच्या जवळपास सर्वच योजना अपयशी ठरल्या आहेत. आता या हल्ल्यांना युक्रेनकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.