'शिवसेना व मनसे एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले मत
मुंबई: प्रतिनिधी
मराठी माणसाच्या हितासाठी आणि त्यांच्या भावनांना मान देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन नाते जुळवणे हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरजली ठरेल, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन मुलाखतींमध्ये बोलताना मनसे आणि शिवसेना यांच्या युती करण्याबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केली होती. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठी माणसाला अभिमानाने मुंबईत राहण्यासाठी आणि मराठी माणसाचे हित साधण्यासाठी या दोन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशीच आमची देखील भूमिका आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मात्र, केवळ मुलाखतींमध्ये भावना व्यक्त करून युती होत नसतात. त्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते पडद्यामागे काय भूमिका मांडतत हे महत्त्वाचे आहे. शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, ही संपूर्ण महाराष्ट्राची, मराठी माणसांची भावना आहे. ही जशी भावनिक भूमिका आहे तशीच राजकीय भूमिका देखील आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांवर मराठी माणसांचा त्यासाठी दबाव आहे. त्यांच्या भावनांची कदर करण्याची आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने पडद्याआड चर्चा नियमितपणे सुरू आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.
ठाकरे आणि पवार ब्रँड संपविणे अशक्य
सुरतची ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याच तावडीतून मुंबई आणि महाराष्ट्र यांची सुटका करण्यासाठी शिवसेना आणि मनसेने एकत्र येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातून ठाकरे आणि पवार हे ब्रँड नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राज ठाकरे यांचे मत योग्यच आहे. मात्र, या देशातून नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस ही नावे विस्मरणात जातील मात्र ठाकरे आणि पवार हे ब्रँड संपणार नाहीत, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले.