'ठाकरे बंधू एकत्र येण्यात संजय राऊत यांचा अडथळा'

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा थेट आरोप

'ठाकरे बंधू एकत्र येण्यात संजय राऊत यांचा अडथळा'

पुणे: प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मराठी माणसांची इच्छा असली तरी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हा एकमेव अडथळा असल्याचा थेट आरोप मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे. 

राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी इच्छा वारंवार व्यक्त केली जाते. सध्या तर ते एकत्र येण्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्या दृष्टीने दोघांनीही सूचक विधाने देखील केली आहेत. मात्र त्यांच्या एकत्र येण्यात संजय राऊत यांच्या विधानांचा अडथळा होत आहे. संजय राऊत वारंवार अशी वादग्रस्त विधाने करतात की त्यामुळे एकत्र येण्याऐवजी ठाकरे बंधूंमधील अंतर वाढते, असे महाजन एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. 

राज यांच्या भूमिकेमुळे समर्थक बुचकळ्यात 

हे पण वाचा  'ती'च्या आत्मसन्मानाची कथा सांगणार 'वामा: लढाई सन्मानाची’ 

राज ठाकरे हे राष्ट्रीय विचाराचे नेते आहेत. मात्र, ऑपरेशन सिंदूर प्रकरणी राज ठाकरे यांनी युद्ध नको, अशी घेतलेली भूमिका त्यांच्या समर्थकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे, अशी स्पष्टोक्ती महाजन यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी पाकिस्तानशी युद्ध करण्याऐवजी देशात कोंबिंग ऑपरेशन करून दहशतवादी पकडा आणि त्यांना ठार करा, अशी भूमिका घेतली होती. त्याबद्दल सर्व स्तरातून आश्चर्य ही व्यक्त करण्यात आले आहे. या भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या समर्थकांना आश्चर्य वाटण्याबरोबरच काहींना मानसिक धक्काही बसल्याचे महाजन यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांचे हिंदुत्व कालांतराने स्वीकारले जाईल

राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सध्या स्वीकारली जात नसली तरी देखील कालांतराने लोकांना तिथ महत्त्व पटेल आणि त्यांची हिंदुत्ववादी विचारसरणी लोकांकडून स्वीकारली जाईल, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt