मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर
'महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होऊ द्या...'
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी आग्रही मागणी कर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या मागणीबाबत उलटफेर घेतला आहे. आधी सत्ताधारी महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू दे, लगेच दुसऱ्या दिवशी आमचा उमेदवार जाहीर करू, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही त्याला दुजोरा दिला.
महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
एकमताने ठरवू मुख्यमंत्री पदाचा उमेदवार
आमच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची महत्त्वाची नाही. महाराष्ट्राला वाचवणे हे आमचे पहिले काम आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्र धोक्यात आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विचारावर चालविण्याचा, राज्याला त्यांचे गुलाम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. त्यापासून राज्याचे रक्षण करायचे आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. आम्ही आमचे निर्णय एक दिलाने घेतो. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील एकमताने ठरवू, असे ठाकरे म्हणाले.
सरकारचे एका महिन्यात 278 निर्णय जाहीर
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी नव्हे तर खोकेवाल्यांसाठी महत्त्वाची आहे. ती टिकावी म्हणून सरकारने एका महिन्यात तब्बल 278 निर्णय जाहीर केले आहेत. अनेक महा मंडळे जाहीर केली आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना स्थापन झालेल्या महामंडळांपैकी किती महामंडळ आज अस्तित्वात आहेत आणि किती महामंडळांना निधी मिळाला आहे, याची तपासणी होणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची होणार पुनरावृत्ती
मी आणि आमचे सहकारी राज्यात सतत फिरत आहोत. राज्यातील जनतेला बदल हवा आहे. आम्ही हे पूर्वीपासून सांगत आलो आहोत. मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणी त्यावर विश्वास ठेवत नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीत राज्यात 31 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. याचा अर्थ जनतेला बदल हवा आहे हे निश्चित आहे. त्याचेच पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटणार असून महाविकास आघाडी मोठा विजय प्राप्त करेल, असा दावा शरद पवार यांनी यावेळी केला.
Comment List