कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

संगीत व कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही

कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

नाशिक: प्रतिनिधी 

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारक परिसराची पाहणी करून त्याच्या विकासासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला. संगीत व कला क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी हे केंद्र आणखी सक्षम व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"संगीत, कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना अधिक संधी मिळावी, त्यांच्या सादरीकरणासाठी या वास्तूचा अधिक उपयोग व्हावा, यासाठी पावले उचलली जातील," असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याशिवाय, कुसुमाग्रज स्मारकात भविष्यात मोठ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या व्यवस्थापनात असलेल्या काही अडचणी, विद्यापीठाशी संबंधित प्रश्न आणि त्यावर उपाययोजना याविषयीही त्यांनी संवाद साधला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या वास्तूचा आणि तिच्या कार्याचा अधिक विस्तार कसा करता येईल, यावरही त्यांनी भर दिला. "विधान परिषद आणि आमदारांच्या माध्यमातून मराठी साहित्य-संस्कृतीच्या जतनासाठी आणि स्मारकाच्या विकासासाठी अधिक योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील," असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करत असताना कुसुमाग्रज यांच्या कार्यातून नेहमी प्रेरणा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. "ही वास्तू महाराष्ट्र आणि भारताच्या गौरवाचे प्रतीक आहे. याची व्याप्ती अधिक वाढवण्यासाठी विविध पातळीवर सहकार्य मिळवण्याचा मी प्रयत्न करेन," असे त्यांनी सांगितले.

हे पण वाचा  'कोण कोणाला गिळतोय ते लवकरच कळेल'

About The Author

Advertisement

Latest News

Advt