'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'
औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्र्यांची ग्वाही
भिवंडी: प्रतिनिधी
औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ५० वर्षांपूर्वी संरक्षण दिले असल्याने ती संरक्षित करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, या राज्यात औरंगजेबाचे महिमामंडण केले जाणार नाही आणि करू दिले जाणार नाही. येथे महिमामंडण फक्त शिवछत्रपतींचेच होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंतीच्या तिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी, नचिकेत महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सध्या पुन्हा एकदा क्रूरकर्मा औरंगजेबाच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील त्याची कबर उखडून टाकावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर वरील खुलासा केला आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठानने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा करतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी येण्यासाठी रस्ते उभारणी करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मराठ्यांच्या जाज्जवल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी बलिदान दिलेल्या तुळापूर येथे भव्य स्मारक उभारले जात आहे. संगमेश्वर येथे संभाजी महाराज नजरकैदेत असलेल्या वाडा व कोठीच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. आग्रा व पानिपत येथे स्मारक उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.