प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
मराठी नाट्य परिषदेच्या सदस्यांचा बहुमताने निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जेष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, नाट्य परिषदेच्या सदस्यांनी बहुमताने हा राजीनामा नामंजूर केला. त्यानंतर दामले यांनी अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नाटकांचे दौरे आणि व्यग्र वेळापत्रक यामुळे नाट्य परिषदेच्या कामाला वेळ देणे शक्य होत नाही. वयाच्या 64 व्या वर्षी नियमित नाट्य परिषदेच्या कार्यालयात येणे जमत नाही, या कारणांसाठी राजीनामा देत असल्याचे दामले यांनी नमूद केले. प्रत्यक्षात नाट्य परिषदेतील विविध प्रकारच्या वादामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.
नाट्य परिषदेच्या सदस्यांनी दामले यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. त्यांना अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली. तसेच अध्यक्षांना कामाचा ताण सहन करावा लागू नये यासाठी परिषदेतील कामे आणि जबाबदाऱ्यांचे विभाजन करावे, अशी सूचना देखील यावेळी करण्यात आली.
नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये भरीव योगदान दिलेल्या दामले यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. नाट्यकर्मींचे संघटन, नाट्यगृहातील सुधारणा, कलाकार आणि पडद्यामागच्या कलाकारांना मिळणाऱ्या सुविधा, सांस्कृतिक क्षेत्राला शासनाकडून प्रोत्साहन, सरकार आणि कलाकार यांच्यातील सुसंवाद यासाठी दामले यांनी मोठे काम केले आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जग ठप्प असताना विशेषतः हातावर पोट असलेल्या पडद्यामागील कलाकारांची अवस्था लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी दामले यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.
Comment List