अखेर सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची यशस्वी घरवापासी
अमेरिकन सरकार आणि नासाच्या चिकाटीचे फळ
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
एक आठवड्यासाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांची तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर यशस्वी घरवापसी झाली आहे. अमेरिका सरकार आणि त्यांची अंतराळसंशोधन संस्था नासाच्या चिकाटीचे हे फलित असून त्यांच्या प्रयत्नांना स्पेस एक्सची मोलाची साथ लाभली.
भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांनी त्यांना घेऊन येणारे अंतराळ यान फ्लोरिडा येथे समुद्रात उतरले. त्यानंतर अंतराळवीरांना अत्यंत काळजीपूर्वक बोटीवर आणण्यात आले. दीर्घ प्रतीक्षेनंतर पृथ्वीवर आलेल्या अंतराळवीरांनी सुस्मित चेहेऱ्याने आणि हात हलवत आपल्या चाहत्यांना दिलासा दिला.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर हे एक आठवड्याच्या संशोधन मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात रवाना झाले होते. त्यांच्या यानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा मुक्काम तब्बल नऊ महिन्यांपर्यंत वाढला. दरम्यानच्या काळात त्यांना परत आणण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र, नासाने चिकाटी आणि खुद्द अंतराळवीरांनी धैर्य सोडले नाही.
एकीकडे परतीचे प्रयत्न विफल असताना काही वेळा हे अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर येऊ शकणार का, असा काळीज चिरणारा सवाल निर्माण व्हावा, अशाही वेळा आल्या. मात्र, अंतराळवीरांनी स्वतःचे मनोबल तर कायम राखलेच पण, आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र हे माझे दुसरे घरंच असल्याचे सांगत चाहत्यांना धीर दिला. या सर्व प्रयत्नांना आज यश लाभले आहे.
या अंतराळवीरांच्या यशस्वी पुनरागमनानंतर नासाच्या कार्यालयासह संपूर्ण अमेरिकेत आणि सुनीता विल्यम्सचे मूळ असलेल्या भारतातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
Comment List