- राज्य
- कोथरूड येथे क्षुल्लक कारणावरून गोळीबार
कोथरूड येथे क्षुल्लक कारणावरून गोळीबार
निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी घातल्या गोळ्या
पुणे: प्रतिनिधी
कोथरूड येथे वाहनाला साईड न दिल्याच्या शुल्लक कारणावरून निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या गोळीबारात प्रकाश धुमाळ हा 36 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कोथरूड येथे प्रकाश आपल्या मित्रांबरोबर रस्त्याच्या बाजूला उभा असताना दुचाकीला जायला जागा दिली नाही या कारणावरून घायवळ टोळीचे गुंड मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला. यावेळी मयूर कुंभारे याने प्रकाश वर तीन गोळ्या झाडल्या. त्याच्या मानेत व मंडित गोळ्या शिरल्या आहेत.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर याच्या खुनाची घटना ताजी असतानाच सर्वसामान्य नागरिकांवर गुंडांनी केलेल्या गोळीबारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पोलिसांचा धाक उरला नाही काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.