'बंजारा समाजाला आदिवासी करणे अयोग्य'
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धर्मरावबाबा अत्राम यांचे वक्तव्य
चंद्रपूर: प्रतिनिधी
बंजारा समाज आदिवासींमध्ये समाविष्ट करणे अयोग्य आहे. हैदराबाद गॅझेटियरचा आमच्याशी काहीच संबंध नाही. भटके विमुक्त आणि आदिवासी हे दोन वेगवेगळे समाज आहेत, असा दावा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी केला.
हैदराबाद गॅझेटियरच्या नावाखाली बंजारा आणि इतर काही समाज आदिवासींमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, असा दावा करणे चुकीचे आहे. आमच्याकडे चंद्रपूर गॅझेटीयर आहे. हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही. ज्यांना हैदराबाद गॅझेटियर हवे आहे त्यांनी हैदराबादला जावे, असे धर्मराव बाबा म्हणाले.
राज्यात आदिवासींची संख्या ही मोठी आहे. आमचे 25 लोक निवडून येऊ शकतात. वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. संघर्ष करू. मात्र अनुसूचित जमातीत घुसखोरी होऊ देणार नाही, असा इशाराही अत्राम यांनी दिला.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे सुलभ व्हावे यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्याचा आदेशही जारी केला आहे. मात्र, त्याच्या विरोधात इतर मागासवर्गीय समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. दुसरीकडे बंजारा व इतर काही समाज हैदराबाद गॅझेटियरनुसार आपला समावेश आदिवासींमध्ये करावा, अशी मागणी करत आहे.