'पुणे, पिंपरी महापालिका निवडणुकीत जातीने लक्ष घालणार'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यकर्त्यांना ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आपण जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही देखील पवार यांनी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविल्या जातील. ज्या ठिकाणी स्थानिक प्रश्न असतील त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचा पर्याय उपलब्ध असेल, असे महायुतीच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, मराठी अस्मितेच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे तब्बल 19 वर्षांनी एका मंचावर आले. तेव्हापासून महापालिका निवडणूक देखील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढवेल असे कयास बांधले जात आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या बोटात खळबळ माजली आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सामर्थ्य मर्यादित आहे. मात्र, पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पडत्या काळात पक्षाचे अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले असले तरी निष्ठावान कार्यकर्त्यांची संख्या अजूनही उल्लेखनीय आहे. त्यामुळे अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.