- देश-विदेश
- ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार
ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाठवली विविध क्षेत्रातील मान्यवर चौघांची नावे
नवी दिल्ली: प्रतिनिधी
नामांकित कायदेतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून निवड केली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हाती लागलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशीपर्यंत पोहोचविणाऱ्या ऍड. निकम यांनी अनेक गुंतागुंतीच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे.
ऍड. निकम यांचा जन्म जळगाव येथे ३० मार्च १९५३ रोजी झाला. त्यांचे वडील नामांकित बॅरिस्टर आणि न्यायाधीश होते. ऍड. निकम यांनी शास्त्र शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर मणियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवून वकिली सुरू केली. विशेषतः फौजदारी कायद्यातील तज्ज्ञ आहेत. जळगाव जिल्हा न्यायालयात अभियोक्ता म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या ऍड. निकम यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक खटल्यात सरकारच्या वतीने काम पाहिले.
मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट, कॅसेट किंग गुलशनकुमार खून, भाजप नेते प्रमोद महाजन खून, कोपर्डी बलात्कार प्रकरण, मुंबईतील २०१३ चा सामूहिक बलात्कार, मुंबईवर २००८ मध्ये झालेला दहशतवादी हल्ला अशा अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये ऍड निकम यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले.
ऍड निकम यांनी हाताळलेल्या खटल्यांचे संवेदनशील स्वरूप पाहता सरकारने त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च z+ सुरक्षा प्रदान केली आहे. त्याचप्रमाणे न्यायदानाच्या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी त्यांना पद्मश्री ही प्रदान करण्यात आली आहे. त्यांचे पुत्र अभिजीत यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी कायद्याच्या क्षेत्रात सेवा देत आहे. ऍड निकम यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक देखील लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.