- राज्य
- संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केल्याचा संशय
सोलापूर: प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. तसेच कारमध्ये आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा प्रकार शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय आहे.
गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन चे कार्यकर्ते त्यांच्यावर संतप्त होते. यापूर्वी त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. त्यामुळे आजच्या कृत्याच्या संशयाची सुई देखील शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडे जात आहे.
गायकवाड हे संभाजी ब्रिगेड आणि फत्तेसिंह शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार देखील आयोजित करण्यात आला होता. ते कार्यक्रम स्थळी पोहोचत असतानाच कार्यकर्त्यांचा जमाव त्यांच्या दिशेने आला. त्यांनी गायकवाड यांना घेराव घातला आणि तोंडाला काळे फासले. त्यानंतर गायकवाड हे आपल्या कार मध्ये जाऊन बसले. कारमध्ये घुसून व रस्त्यावर ओढून काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
या प्रकरणी गायकवाड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.