पर्यावरणपूरक शाश्वत विकास ही काळाची गरज: अजित पवार

प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशनचे उद्घाटन

पर्यावरणपूरक शाश्वत विकास ही काळाची गरज: अजित पवार

पुणे: प्रतिनिधी

भारत देश आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे, कारण आपल्या देशाचा विकासाचा वेग वाढला आहे, यामध्ये मोठ्या प्रकल्पांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आपल्याकडे इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू, पूल आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत असल्याचे दिसते मात्र आपण चाळीस वर्षांपूर्वी केलेल्या कामाचे पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे हे का होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे. आज पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि आपत्ती रोधक बांधकामे काळाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात रविवारी प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन या संस्थेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शेषराव कदम, सचिव अजय कदम, कोषाध्यक्ष अजय ताम्हणकर, नारायण कोचक, अशोक मोरे, विरेद्र चव्हाण, नितीन लाळे, अंशुमन भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले स्ट्रक्चरल इंजिनिअर्स चे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे, संस्थेची स्थापना फार पूर्वी होणे गरजेचे होते. एखादा पूल किंवा इमारत कोसळली की आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट आठवते मात्र बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे असते त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पूर्वीची बांधकामे मजबूत होती आजही आपण त्याच धर्तीवर काम करत आहोत मात्र त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, या सोबतच ते काम दीर्घकाळ टिकणारे असावे याची खात्री करणे गरजेचे आहे.

हे पण वाचा  शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान

एकूण स्ट्रक्चरल इंजिनिअर फार कमी आहेत त्यातही नवीन पिढी या क्षेत्रात येत नसेल तर नियमांत काय बदल करणे आवश्यक आहे ते सांगा, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल. असेही पवार यांनी सांगितले. 

प्रस्ताविक भाषणात अजय कदम म्हणाले, "प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन" ही नोंदणीकृत सहकारी संस्था जानेवारी २०२५ मध्ये स्थापन करण्यात आली. या संस्थेची स्थापना स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या व्यावसायिक, सामाजिक व कायदेशीर विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. आजच्या घडीला संस्थेचे १२० पेक्षा अधिक सभासद आहेत, जे महाराष्ट्रभर विविध नागरी, औद्योगिक व पायाभूत प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत.

संस्थेचा प्रमुख उद्देश स्ट्रक्चरल इंजिनिअर्सच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि सामाजिक बांधिलकी यामध्ये संतुलन निर्माण करणे हा आहे. यामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदेशीर जबाबदाऱ्या समजून घेणे, समाजाप्रती असलेली नैतिक व व्यावसायिक कर्तव्ये पार पाडणे, व त्यांना त्यांच्या कार्यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा योग्य वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वाचे घटक आहेत.

याशिवाय, संस्थेमार्फत विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, सेमिनार्स आणि व्याख्याने आयोजित करून सदस्यांचे कौशल्यवृद्धी केली जाणार आहे. नवोदित व भावी स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना योग्य दिशा देणे, मार्गदर्शन करणे आणि त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे हे देखील संस्थेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

अध्यक्ष शेषराव कदम म्हणाले स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना भारतीय संविधानात स्थान मिळावे, त्यांचा कायदेशीर दर्जा ठरावा आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व मान्य व्हावे यासाठी "इंजिनिअर्स बिल" च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. हा कायदा कार्यान्वित झाल्यास, स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना स्वतंत्र ओळख, अधिक अधिकार व जबाबदाऱ्या प्राप्त होतील आणि त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरेल.

"प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन" ही संस्था म्हणजे एक व्यासपीठ असणार आहे जिथे ज्ञान, अनुभव आणि एकत्रित प्रयत्नांची देवाणघेवाण होईल. संस्थेचा उद्देश केवळ व्यावसायिक विकास नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जबाबदार स्ट्रक्चरल इंजिनिअर्स तयार करणे हा आहे.

कार्यक्रमात शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यकारिणी सदस्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कानेटकर यांनी केले तर आभार अजय ताम्हणकर यांनी मानले.

About The Author

Advertisement

Latest News

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध
मुंबई: प्रतिनिधी  संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर...
... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे
'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'
पर्यावरणपूरक शाश्वत विकास ही काळाची गरज: अजित पवार
'पुणे, पिंपरी महापालिका निवडणुकीत जातीने लक्ष घालणार'
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले
ऍड. उज्ज्वल निकम झाले राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार

Advt