- राज्य
- स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी
स्नेहमेळाव्यात ज्येष्ठ पत्रकारांनी जागविल्या जुन्या आठवणी
अक्षरकला मीडियाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव
पुणे: प्रतिनिधी
पुण्यातील कोहिनूर मंगल कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या स्नेहमेळाव्यात जुन्या पिढीतील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या काळातील आठवणींना उजाळा देत वृत्तपत्र क्षेत्रातील जुने संदर्भ, महत्त्वाच्या घटना आणि अनेक सामाजिक घडामोडींच्या आठवणी जागविल्या. पुण्यातील माध्यम समन्वयक प्रवीण प्र. वाळिंबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवृत्त ज्येष्ठ पत्रकार स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. प्रारंभी ‘अक्षरकला मीडिया’च्या तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी स्वागतगीत गायिले. ‘अक्षरकला मीडिया’चे रोहिणी अद्वैत, सागर बाबर आणि मधुरा नातू यांनी सर्वांचे स्वागत केले. ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले यांनी पुण्यातील दिवंगत पत्रकारांच्या नावांच्या यादीचे वाचन केले. सर्वांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. ‘अक्षरकला मीडिया’चे प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणले की, ’१० वर्षांपूर्वी पुण्यातील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित केली व पहिला निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. आता निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांच्या ग्रुपमध्ये १२५हून अधिक निवृत्त ज्येष्ठ पत्रकार आहेत.’
यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार, ‘पुणे फेस्टिव्हल’चे उपाध्यक्ष व ‘कोहिनूर ग्रुप’चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या २१ निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा पुणेरी पगडी आणि पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित तीनही पाहुण्यांनी निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव केला. ‘राजकारण्यांवर आणि समाजातील गैरप्रवृत्तींवर अंकुश ठेवणारे पत्रकार निष्ठेने आयुष्यभर एका अर्थाने समाजाची सेवाच करीत असतात. आज आर्थिक परिस्थिती थोडी बदललेली असली, तरी पूर्वीच्या काळी पत्रकारांना पोटाला चिमटा देऊन आपली सेवा बजावावी लागत असे. परंतु अशा कष्टदायी वातावरणातही अनेक पत्रकारांनी उत्तम काम करून चांगली समाजसेवा करीत उत्तम आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. पुण्यात अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुण्यातील पत्रकार महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांसाठीचे आदर्श ठरले आहेत,’ असे गौरवोद्गारही उल्हास पवार यांनी काढले.
‘कोहिनूर ग्रुप’चे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, ‘पूर्वी पगार कमी होते, तरी पत्रकारितेतील निष्ठा मोठी होती. समाजाचे प्रबोधन करीत समाजाला चांगली दिशा देण्याचे काम पत्रकारांच्या जुन्या पिढीने केले. जुन्या पिढीतील पत्रकार हे ‘कोहिनूर’ हिऱ्याप्रमाणे चकमदार असून, समाजाला त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले,’ असे कृष्णकुमार गोयल म्हणाले.
दै. ‘बेळगाव तरुण भारत’चे संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर म्हणाले की, ‘पत्रकारिता हा धर्म असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आजही माध्यमांकडे समाज अपेक्षेने बघतो. ध्येयवादी पत्रकार हे समाजाचे वैभव असून, पुण्यातील निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांचा असा स्नेहमेळावा महाराष्ट्रात एकमेव होत असावा,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.
यावेळी निवृत्त ज्येष्ठ पत्रकारांतर्फे डॉ. कुमार सप्तर्षी, कर्नल विनायक तांबेकर, अरविंद गोखले, सुधीर गाडगीळ, मुकुंद संगोराम, चंद्रशेखर कारखानीस, विनीता देशमुख , राजीव साबडे आदींनी मनोगत व्यक्त केले. दै. ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी, ‘पुण्यनगरी’चे संपादक श्रीकांत साबळे, ‘प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट, ‘सामना’चे निवासी संपादक अरुण निगवेकर, ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक सुनील माळी, पुणे ‘लोकसत्ता’चे माजी संपादक मुकुंद संगोराम, दै. ‘प्रहार’चे माजी संपादक सुकृत खांडेकर, ‘सत्याग्रही’चे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी, दै. ‘सकाळ’चे मुख्य वार्ताहर मंगेश कोळपकर, दै. ‘लोकमत’चे मुख्य वार्ताहर राजू इनामदार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्याला सुमारे १००हून अधिक निवृत्त ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. त्यांमध्ये निवृत्त महिला पत्रकारांची संख्याही मोठी होती. ‘अक्षरकला मीडिया’च्या श्रुती तिवारी यांनी आभारप्रदर्शन केले.