न धरावा राग...

न धरावा राग...
दखल बेदखल / रमेश कुलकर्णी
 
मुख्याध्यापक पित्याने आपल्याच मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच सांगली जिल्ह्यात घडली. यानिमित्ताने संतापाच्या भरात घडणाऱ्या कृत्यांची उजळणी सुरू झाली आहे. 'संताप' ही अशी पेटती मशाल आहे, जी दुसऱ्याला नव्हे, तर हाती धरणाऱ्यालाच जाळते. रागावलेल्या क्षणी वापरलेल्या शब्दांमुळे शांत झाल्यावर लाज वाटणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे नेहमी बोलले जाते. "राग हा माणसाचा शत्रू आहे," हे बोधवचन तर बालवयापासूनच मनावर बिंबविले जाते. 'रागावर नियंत्रण हवे' हा सार्वत्रिक शहाणपणाचा सल्ला ऐकतच आपण मोठे होत असतो. रागामुळे शारीरिक आणि मानसिक विकार जडण्याची भीती नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यातील घटनेने एका (सु) शिक्षित बापाचीही हत्या झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
 
 
रागामुळे मधुमेह आणि रक्तदाबाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले असल्याचे संशोधनाने सिद्ध केले आहे. आजच्या स्पर्धायुगात मनुष्याची जीवनशैली बदलली. त्यामुळे असुरक्षितता वाढली. प्रत्येकाला पुढे जायचे आहे. सर्वत्र आसुरी स्पर्धेची लागण झाल्याने अनेकांची किरकोळ कारणावरून चिडचिड वाढली आहे. छोट्या गोष्टींसाठी त्रागा करण्याची सवय नकळत आत्मसात केली गेली. परिणामी मनुष्यातील सहनशीलता आणि संयमाचे बंध कमकुवत झाले आहेत. 'कळते पण वळत नाही' अशा द्विधा मानसिकेतून मनुष्याची वाटचाल सुरू असते. राग नियंत्रणाचे पद्धतशीर व्यवस्थापन देणाऱ्या तज्ज्ञांनी हार मानावी, असे सध्याचे चित्र आहे.
 
 
राग येण्याची अनेक कारणे आहेत. मनुष्याचा स्वभाव, वृत्ती, अपमान, अनिद्रा, अपेक्षाभंग, उपहास आणि प्रासंगिक स्थिती, परिस्थितीतून राग अनावर होऊ शकतो. व्यक्तिपरत्वे या घटकांत बदल होऊ शकते. माझ्या मनात आहे तसेच घडले पाहिजे ही वृत्ती राग येण्यास मुख्यत्वे कारणीभूत ठरते. मनासारखे घडले नाही की, माणूस संतापतो. राग आल्यावर मनुष्य अनियंत्रित होतो. विचारशून्य होतो. विचारशून्यतेतून विवेक गमावितो. परिणामी योग्य-अयोग्य यामधील भेद करण्यात तो चुकू शकतो. आपल्या अनियंत्रित रागाचा फटका सहन करणारे बहुसंख्येने आपलेच प्रियजन वा आप्तस्वकीय असण्याची शक्यता अधिक असते. मनातील शाब्दिक रागाच्या तडाख्यात नातेसंबंध उद्ध्वस्त झाल्याची शेकडो उदाहरणे आसपास आढळतील. शारीरिक रागाचे रूपांतर हिसंक स्वरूपात बाहेर येते. सामाजिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण हे त्याचेच द्योतक आहे. क्षणिक रागाच्या भरात हत्येसारखा गुन्हा घडल्याच्या असंख्य घटना दिवसागणिक वाढत आहेत.
 
 
सांगली जिल्ह्यातील घटना क्षणिक रागातून झाली असावी. आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी या छोट्या गावातील या कृत्याने अवघ्या महाराष्ट्राला अस्वस्थ केले. दहावीमध्ये ९२ टक्के घेऊन गावात 'टॉपर' आलेल्या मुलीने डॉक्टर व्हावे ही पालकांची इच्छा होती. पालक स्वतः शिक्षकीपेशामध्ये होते. असे अनेक पालक आपल्या पाल्यांवर नकळतपणे अपेक्षांचे ओझे टाकत असतात. सारासार विचार न केल्याने उद्वेग वाढतो. वैद्यकीय प्रवेशाच्या चाचणी परीक्षेत इतके कमी गुण का आले? हा एका पित्याने काळजीतून विचारलेला साधा प्रश्न होता. या साधारण वाटणाऱ्या प्रश्नातून सुरू झालेला संवाद नंतर वादात रूपांतरित झाला. कुठल्याही पालकाला आपल्या मुलांकडून उलट उत्तरांची अपेक्षा नसतेच.
 
 
उर्मट उत्तरांची तर नाहीच नाही. या घटनेत नेमके तेच घडले. "तुम्ही शिकून कोणते मोठे कलेक्टर झाले?" हे मुलीचे प्रत्युत्तर मुख्याध्यापक असलेल्या पित्याच्या जिव्हारी लागले. त्यानंतर आलेल्या रागावर नियंत्रण ठेवू न शकल्याने या पित्याला आपल्याच मुलीच्या हत्येचा आरोपी म्हणून तुरुंगात जावे लागले. खरी बिकट अवस्था तर त्या माउलीची आहे. एकीकडे मुलगी गमाविली. दुसरीकडे आपल्याच पतीविरोधात तक्रार करावी लागली. कदाचित तो क्षणिक रागाचा प्रसंग मुख्याध्यापकाला टाळता आला असता, तर आज हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते. तो क्रोधाचा क्षण खरेच टाळता आला असता, असे त्या पित्याला आता वाटत असेल; पण पश्चात्तापाआधी नको ती कृती घडून गेली आहे. आपल्या पवित्र भूमीत संतांनी असंख्य अपमान, अपराध सोसले. रागावरील नियंत्रणाचे असंख्य दाखले संतवचनांतून दिले. मनावरील संयमाचे श्लोक लिहिले. मानवी जीवनाच्या उत्क्रांतीसाठी त्यांचेच अभंग मदतीला धावून आले. क्षणिक संतापाचे बळी ठरून विवेकशून्यतेकडे नेणाऱ्या या प्रवासाला आपल्यालाच संयमाने संपुष्टात आणावे लागेल. वारीच्या पवित्र महिन्यात मनःशांतीचा संकल्प सिद्धीस नेऊन प्रत्येकाला अंतरात्म्यातील विठाईचे दर्शन व्हावे हीच अपेक्षा आहे.
 
"निष्ठुर उत्तरीं न धरावा राग। आहे लागभाग ठायींचाचि ॥
तूं माझा जनिता तूं माझा जनिता। रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥"
 
अशी आळवणी जगद्‌गुरू तुकोबारायांनी विठुरायाच्या चरणी केली होती. एका वत्सल पित्याच्या मनातील नेमका हा करुणामयी भाव जागृत असता, तर आज सांगलीतील कुटुंबाची सावली हिरावली गेली नसती.
 
000

About The Author

Related Posts

न धरावा राग...

न धरावा राग...

Advertisement

Latest News

Advt