- देश-विदेश
- '... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा'
'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा'
खरगे यांना पंतप्रधान पदाचा चेहेरा बनविण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली: प्रतिनिधी
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधकांच्या वतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव हा प्रत्यक्षात राहुल गांधी यांना या पदासाठीच्या स्पर्धेतून दूर करण्याचा सापळा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.
विरोधकांच्या इंडिया या आघाडीच्या चौथ्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी खर्गे यांना इंडिया आघाडीच्या वतीने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला. खरगे हे देशाचे पहिले दलित पंतप्रधान ठरू शकतील, असा दावाही यावेळी करण्यात आला. मात्र, आधी बहुमत प्राप्त करू आणि नंतर पंतप्रधानपदाचे पाहू, असा पवित्रा खरगे यांनी यावेळी घेतला.
ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांचा हा प्रस्ताव म्हणजे खर्गे आणि राहुल गांधी या दोघांसाठीही रचलेला चक्रव्यूह आहे. बॅनर्जी आणि केजरीवाल या दोघांनाही माहित आहे की राहुल गांधी मैदानात असताना खरगे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकत नाहीत. तरीही राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी त्यांनी रचलेला हा सापळा आहे, असे मत सिंह यांनी व्यक्त केले.
... हा पोराटोरांचा खेळ नाही: रामदास आठवले
इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येण्यामागे विरोधी घटक पक्षांचा कोणताही ठोस विचार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे, या एकमेव उद्देशाने ही आघाडी साकारली आहे. मात्र, पंतप्रधान मोदी हे कणखर व्यक्तिमत्व असलेले नेते आहेत. त्यांनी भारताच्या आणि भारतीयांच्या प्रगतीसाठी अथक काम केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात विजय प्राप्त केला आहे. दक्षिणेकडील तेलंगणातही भाजपच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. जनमत आमच्या बाजूला असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे मोदी यांचा पराभव करणे हा पोराटोरांचा खेळ नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केले.