- राज्य
- '... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'
'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा
नाशिक: प्रतिनिधी
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जर नाशिक येथे आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर उपप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार अपमान होत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
यापूर्वी दोन वेळा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 'माफीवीर' असा उल्लेख करून त्यांचा अवमान केला होता. त्याबद्दल खुद्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता तर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी यांनाच काळे फासण्याची धमकी दिल्यानंतर राजकीय वातावरण तापणार आहे.
महाविकास आघाडी गेली खड्ड्यात...
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा अवमान झाला तर काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना सोडणार नाही. त्यावेळी राजकारण वगैरे काही बघणार नाही. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात. आमच्या दृष्टीने सावरकर, हिंदुत्व हे विषय आधी येतात, असेही बाळा दराडे यांनी नमूद केले आहे.
गांधी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी वारंवार सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य करीत असल्यामुळे भारतीय जनता पक्षासह शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथील वकील मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.