उलवे येथे सिडको उभारणार 'पंतप्रधान एकता मॉल'
केंद्र सरकारकडूनही मिळणार आर्थिक सहकार्य
नवी मुंबई: प्रतिनिधी
स्वदेशी उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि त्याच वेळी राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, अशा दुहेरी उद्देशाने केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्रासाठी पंतप्रधान एकता मॉलची उभारणी उलवे येथे केली जाणार आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या वतीने सिडकोकडून उभारला जाणार आहे.
विविधतेतून एकता या संकल्पनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यात अशा मॉलची उभारणी करण्याची सूचना केली आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने या मॉलमध्ये उपलब्ध असणार आहेत.
स्थानिक कारागीर, उत्पादक आणि व्यावसायिक यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने व आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या संकल्पनांच्या आधारे या मॉलची उभारणी करण्यात येणार आहे. या मॉलमध्ये इतर राज्यातील उत्पादनासाठी एक तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक अशी विक्री दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मॉल च संचलन आणि देखभालीसाठी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येणार असून वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे सदस्य असणार आहेत. उलवेमधील मॉलसाठी सिडकोने 5200 चौरस फूट जागाही निश्चित केली आहे.
पर्यटनालाही मिळणार चालना
पंतप्रधान एकता मॉलच्या माध्यमातून पर्यटनाला चलना देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. त्यानुसार या मॉलमध्ये एक सांस्कृतिक सभागृह देखील उभारण्यात येणार आहे. या सभागृहात राज्यातील आणि देशातील कलावंत आपली कला सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही या ठिकाणी करण्यात येणार आहे.