- राज्य
- शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची 'लोहगड मोहीम' फत्ते
शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची 'लोहगड मोहीम' फत्ते
पुणे: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला १७ ऑगस्ट रोजी ३५९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान व शिवशंभू प्रतिष्ठान हडपसर यांनी किल्ले लोहगड दर्शन मोहीम आयोजित केली. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील पन्नासहून अधिक शिवभक्तांनी सहभाग घेतला, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल जेधे यांनी दिली.
या मोहिमेत गडावरील महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच या मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या शिवभक्तांचा शिवसन्मान शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय आबनावे आणि संदेश साखरे यांनी केला. यावेळी शिवव्याखाते बालाजी काशीद यांनी गडाची माहिती देताना इतिहासातील अनेक दाखले देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासच गडावर जिवंत केला.
बालाजी काशीद म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडाचे संवर्धन करावे, छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन फिरण्याचा विषय नसून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोक्यात घेऊन त्यानुसार वर्तणूक ठेवण्याचा विषय आहे. येणाऱ्या काळात सर्व गडकिल्ले हे अतिक्रमणमुक्त व सुरक्षित कसे राहतील, या वर लक्ष द्यावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.
या मोहिमेत शिवभक्त अमर बोत्रे, उमेश कदम, विशाल बोत्रे, दिलीप ढमाले, रामदास कोचळे, सचिन दत्वे, व्यंकटेश वाघमारे, ऋषी पासलकर, विराज कोकाटे, चिंतामणी देशमुख, अभिजीत कदम, अमोल सुतार, शिवाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर तांबे, आर्यन जेधे, अदित्य ढमाले, वेदांत भोसले, सिद्धार्थ ढमाले, तसेच प्रतिष्ठानचे सर्व संचालक, मोठ्याप्रमाणावर शिवभक्त आणि शिवकन्या सहभागी झाल्या.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल (बापू) जेधे यांनी सर्व शिवभक्तांचे आभार मानत असताना खंत व्यक्त केली की या गडावर मोठ्याप्रमाणात तरूणाई येत आहे. मात्र, या अनेक तरुण धूम्रपान करताना व काही तरूणी अक्षय पारह पेहरावात रिल्स बनवताना आढळून आले. गड व्यवस्थापकांचे याकडे लक्ष नव्हते, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर जाताना तरुणाईने आपल्या भारतीय संस्कृतीनुसार पोशाख धारण करून त्या ठिकाणांचे पावित्र्य राखावे, असे आवाहनही अनिल (बापू) जेधे यांनी केले.
पुणे जिल्ह्य़ातील लोणावळ्याजवळ असलेला लोहगड किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे साडेतीन हजार फूट उंचीवर असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये गर्वाने उभा असलेला हा लोहगड किल्ला दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देतो.