- राज्य
- शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात
शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात
नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांनी घेतला पुढाकार
सोलापूर: प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे भारतीय जनता पक्षामध्ये विलीनीकरण करण्यास सोलापूर येथून सुरुवात होत असून त्यासाठी शिंदे गटाचे नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात सोलापुरातून झाली असली तरी देखील राज्यभरात मोठ्या प्रमाणावर नाराज असून आपले अनुकरण राज्यभरातील शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते करतील, असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नेतृत्व स्वीकारत एकनाथ शिंदे शिवसेनेचे सोलापूर शहर समन्वयक व माजी महापौर दिलीप कोल्हे भाजपात प्रवेश करणार आहेत. येत्या तीन दिवसात पक्षप्रवेशाची तारीख निश्चित करण्याची हमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा त्यांचा दावा आहे.
तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या 11 तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माढा येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत उपस्थितांनी पक्षाकडून नेत्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे मत व्यक्त केले. सावंत संपर्कप्रमुख असताना देखील त्यांना विश्वासात न घेता अधिकार नसलेल्या लोकांच्या सल्ल्याने पदाधिकाऱ्यांची निवड होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आपल्या भावना शिष्टमंडळामार्फत पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवून देखील त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, असा नाराज गटाचा दावा आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी धोरण ठरवण्याचे अधिकार तानाजी सावंत व दिलीप कोल्हे यांना देण्यात आले. त्यांच्या पुढाकाराने भाजप व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी व्यक्त करण्यात आली. पालकमंत्र्यांनी शिवसेनेतील नाराज नेत्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर घडवून आणली आणि त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या. पुढील तीन दिवसात या नाराज नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा तानाजी सावंत व नाराज गटाचा दावा आहे.