- राज्य
- अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली
अतिवृष्टीमुळे तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली
नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करण्याची उपमुख्यमंत्री पवार यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली गेली असून नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करण्यात येणार आहेत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी जीवित हानी झाली आहे. जनावरे वाहून गेली आहेत. पाणी शिरल्याने घरांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री पवार वॉर रूममधून घेत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पावसाच्या परिस्थितीची आणि नुकसानीची माहिती त्वरित उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात बहुतेक ठिकाणी धरणे ओसंडून वाहत आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी उपस्थित राहील, अशा सूचना जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. पूरस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. शेजारी राज्यांनी धरणातील पाणी खाली सोडले नाही तर आपल्याकडे पाण्याचा फुगवटा होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन कर्नाटक सारख्या राज्यांशी समन्वय साधला जात आहे, असे पवार यांनी सांगितले.
पूर आणि अतिवृष्टीने बाधित असलेल्या जनतेला मदत करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहेत. तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या आव्हानात्मक काळात घाबरून न जाता शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.