श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानसाठी 280 कोटींचा विकास आराखडा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
पुणे: प्रतिनिधी
श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विकासासाठी २८० कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला असून येथे येण्यासाठीचा रस्ता चांगला करण्यासह येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे, राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. चांगले पीक येऊ दे; राज्यातील सर्व जनतेच्या जीवनात सुख, समाधान, आनंदाचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकरचरणी केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
भीमाशंकराचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातून, देशभरातून लाखो शिवभक्त येथे श्रावणातील सोमवारी दर्शनासाठी येतात. आपणही त्यातील एक शिवभक्त असून दरवर्षीप्रमाणेच श्रावणातील दर्शनासाठी आलो आहे. हे प्राचीन देवस्थान असून दर्शन घेऊन समाधान, आनंद लाभतो.