- राज्य
- 'पुण्यातील प्रमुख पर्यटनस्थळांसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य'
'पुण्यातील प्रमुख पर्यटनस्थळांसाठी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य'
अनियंत्रित गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे: प्रतिनिधी
पुण्यातील लोणावळा खंडाळा या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांसह अनेक ठिकाणांना पर्यटकांकडून पसंती मिळते. मात्र, अनियंत्रित आणि बेजबाबदार गर्दीमुळे अनेकदा छोट्या मोठ्या स्वरूपाच्या दुर्घटना आणि अपघात घडल्याची उदाहरणे आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या 22 पर्यटन स्थळांवर जाण्यापूर्वी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
या ठिकाणांमध्ये सिंहगड किल्ला, अंधारबन, राजगड, तोरणा, कामशेत, शिवनेरी किल्ला, मढे घाट, टायगर पॉईंट – लायन पॉईंट (लोणावळा), बनेश्वर – नसरापूर, तिकोणा, कदमबानवाडी गवताळ प्रदेश, शिर्सुफल गवताळ प्रदेश, भिगवण पक्षी अभयारण्य, ताम्हिणी घाट, मिल्कीबार धबधबा, नाणेघाट, भुशी डॅम, कन्हेरी, कर्जत परिसरातील काही घाटवाटा, लोणावळा परिसरातील काही जलप्रपात, पवना डॅम, विसापूर किल्ला यांचा समावेश आहे.
या ठिकाणांवर मर्यादित संख्येने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाइन बुकिंग करताना त्या ठिकाणी थांबण्यासाठी वेळेची मर्यादा (टाईम स्लॉट) घातली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासाठीची नियमावली आणि बुकिंगसाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ते पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बुकिंग न करता या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.