'संजय राऊत बनले राहुल गांधींचे पगारी नोकर'
भाजपा माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन यांची कठोर टीका
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि संपूर्ण उबाठा गटच काँग्रेसचे बटीक झाले आहेत. राऊत यांनी पगारी नोकर होऊन राहुल गांधी यांची वकिली घेतली आहे, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बन म्हणाले की निवडणूक आयोगाने मतचोरी मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत सर्वांना निरुत्तर केले. आयोगाने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला असता काँग्रेसच्या प्रवक्त्यांऐवजी उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते, वकील असल्यासारखे राहुल गांधींची बाजू मांडण्यासाठी पुढे येत आहात हे हास्यास्पद आहे.
मतचोरी महाराष्ट्रात झालेली नाही. जर झाली असती तर लोकसभेला महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असत्या का, याचा सारासार विचार तरी करा, असे सांगत बन म्हणाले की, लोकसभेला जास्त जागा मिळतात तेव्हा ती मतचोरी नसते. पण विधानसभेला जनतेने भाजपाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भरभरून आशीर्वाद दिले की तुम्हाला पोटदुखी होते. लोकसभेवेळी ईव्हीएम, निवडणूक आयोगावर आक्षेप नव्हता, तेव्हा आयोगाचा कारभार योग्य होता मात्र विधानसभेत भाजपा महायुतीला भरभरून मते मिळाल्यानंतर लागलीच हे प्रश्न तुम्हाला कसे पडतात, असा सवालही त्यांनी केला.
बाळासाहेबांनी काँग्रेसविरोधात सातत्याने भूमिका घेतली होती. ’माझी शिवसेना जर काँग्रेससारखी झाली तर माझे दुकान बंद करेन’ असे रोखठोक विचार बाळासाहेबांचे होते. मात्र आता उबाठाचे राऊत हे काँग्रेस आणि राहुल गांधी यांची वकीली करत आहेत. 'उबाठा'च्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील राऊत यांची भूमिका आवडणार नाही. उबाठांनी राऊत हे राहुल गांधी, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत की आपले प्रवक्ते आहेत हे तपासून घ्यावे अशी खोचक टिप्पण्णी बन यांनी केली.
सामनाच्या अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन म्हणाले की काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मुखपत्रात देखील भाषा वापरली जाणार नाही, अशी हीन भाषा राऊत वापरत आहेत. सामना हे काँग्रेसचे मुखपत्र आहे, हे घोषित केले आहे का, असा सवालही बन यांनी केला.
महाराष्ट्राची परंपरा पाहिली तर महाराष्ट्राशी संबंधित एखादा माणूस राष्ट्रीय स्तरावर जात असताना त्याचे अभिनंदन केले जाते. मात्र, आज उबाठा गटाला स्वतंत्र बाणा उरला नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्पतीपदाचे उमेदवार म्हणून झालेल्या घोषणेचे स्वागत करणे अपेक्षित होते. मात्र काँग्रेसच्या भूमिकेला ‘मम’ म्हटल्याशिवाय 'उबाठा'ला पर्याय उरलेला नाही अशी दयनीय अवस्था राऊत यांच्यामुळे झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मंत्र्यांच्या लंडनवारीवर टीका करण्याचा अधिकार नाही
आमच्या मंत्र्यांची वारी ही महाराष्ट्राच्या विकासासाठी असते. रघुजीराजे भोसले यांची तलवार राज्यात आणण्यासाठी भाजपाचे मंत्री आशीष शेलार लंडनला गेले होते. मराठ्यांचा इतिहास तलवारीच्या साक्षीने उभा आहे .तो इतिहास महाराष्ट्रात येत असेल तर तुम्हाला पोटात दुखायचे कारण काय? तेव्हा लंडनवारीबद्दल बोलायचा अधिकार राऊत यांना नाही. कोवीड काळात महाराष्ट्रातील जनता तडफडत असताना तुम्ही सर्वजण घरात बसून होतात याचीही आठवण बन यांनी करून दिली. त्याकाळात कोणी, कधी, कुठे, कशी, कशासाठी, कोणा सोबत लंडनवारी केली त्याचा सर्व तपशील आमच्याकडे आहे. तुम्ही अशी भाषा वापराल तर ते सर्व तपशील महाराष्ट्रासमोर ठेवावे लागतील, असा इशारा बन यांनी दिला. हिंदुत्ववाद, बाळासाहेबांचे विचार शिल्लक असतील तर तलवारीचे स्वागत केले पाहिजे. उबाठा आणि आदित्य यांना विनंती की थोडाजरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी तलवारीचे दर्शन घ्यावे.