'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य'
अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रतिभा शिंदे राष्ट्रवादीत डेरेदाखल
जळगाव: प्रतिनिधी
आपण सत्तेत असलो तरच निर्णय घेणे शक्य होते. धोरणे निश्चित करून ती अमलात आणता येतात, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना काढले.
या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह खानदेशातील हजारो आदिवासी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला.
मागील 35 ते 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपण अनेक चढउतार पाहिले. सत्तेत असताना कशी कामे करता येतात, ते पाहिले. सत्ता नसली की कशा अडचणी येतात हे देखील अनुभवले, असे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.
प्रतिभा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याचा कधीही पश्चात्ताप होणार नाही, याची आपण हमी देतो. आमचे सर्व नेते कार्यकर्ते त्यांच्याबरोबर एकत्र काम करतील, अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश झाल्याने जळगाव मध्ये पक्षाची ताकद वाढणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.