- राज्य
- 'गोवंश हत्या बंदी कायदा ठरला गोपालक हत्या कायदा'
'गोवंश हत्या बंदी कायदा ठरला गोपालक हत्या कायदा'
सदाभाऊ खोत यांचा सरकारला घरचा आहेर्
सांगली: प्रतिनिधी
गोवंश रक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेला गोवंश हत्या बंदी कायदा हा कथित गोरक्षकांच्या मुजोरीमुळे गोपालक हत्या कायदा बनला आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि शेतकरी चळवळीचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
सध्याच्या काळात गोरक्षण हा तथाकथित गोरक्षकांचा गोरखधंदा बनला आहे. भर रस्त्यात गोपालकांची जनावरे अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने खंडणी वसूल करण्यात येत आहे. खंडणी देण्यास नकार देणाऱ्या गोपालकांना अमानुष मारहाण केली जात आहे, अशी टीका खोत यांनी केली.
आधीच गोपालकांना भाकड जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे भोपालक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच अशा मुजोर गोरक्षकांच्या खंडणीखोरीमुळे त्याच्या संकटात अधिक भर पडली आहे, हे सदाभाऊंनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील तथाकथित गोरक्षकांच्या गोपालकांवर होणाऱ्या दादागिरी आणि खंडणीखोरीचा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी अशा खंडणीखोर गोरक्षकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. गोपालक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.