- राज्य
- शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
ठाणे: प्रतिनिधी
वाढत्या घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट 'लाडकी सून' योजना राबविणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू- सुनांचा सन्मानही केला जाणार आहे.
सासू आणि सुनांचे विळ्या भोपळ्याचे नाते पूर्वापार चालत आले आहे. हे नाते सुधारून घरगुती हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी शिवसेना शाखा आणि कार्यालयामार्फत केली जाणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक घरात लाडकी मुलगी असते. मात्र, सून लाडकी असतेच असे नाही. अनेक सुनांना सासरी छळ सहन करावा लागतो. अशा अन्यायग्रस्त सुनांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर अशा सुनांनी न घाबरता संपर्क साधावा. समुपदेशनाने सासू, सून संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचा उपयोग न झाल्यास आहेच 'शिवसेना स्टाईल,' असे शिंदे यांनी सांगितले.
ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार असून माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 8828862288 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.