- राज्य
- नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
पूर आणि अतिवृष्टी, वेगाने बचावकार्य सुरू, सैन्यालाही केले पाचारण
नांदेड: प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून सध्या पावसाचे प्रमाण ढगफुटीसारखे आहे. लेंडी धरणाने पाण्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून त्यासाठी सैन्यालाही पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन नांदेडमधील पावसावर आणि पूरपरिस्थितीवर आपली नजर असल्याचं सांगितलं आहे.
"नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत," असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसेच, "हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत," असंही फडणवीस म्हणालेत.
त्याचबरोबर, "एनडीआरएफचा एक चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे," असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.