- राज्य
- जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
शशिकांत शिंदे होणार शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष
मुंबई: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शशिकांत शिंदे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. शिंदे दि. १५ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतील, असे सांगितले जात आहे.
पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची दीर्घकाळ संधी दिली. तब्बल सात वर्ष आपण ही जबाबदारी पार पाडली आहे. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आली आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी काही दिवसांपर्वी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी केली होती.
याबाबत बोलताना संभाव्य प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणतेही नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. इतर अनेक नावांबरोबर आपले नावही चर्चेत असल्याचे समजते. पक्षाच्या बैठकीचा निरोप आला आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यात येईल. पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्ष जो काही निर्णय घेईल त्याचे आपण पालन करू.