- राज्य
- शिरसाट राऊत यांच्यावर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा
शिरसाट राऊत यांच्यावर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा
खालच्या पातळीवर उतरून बदनामी करीत असल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अत्यंत खालच्या पातळीवर उतरून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्याबद्दल राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे शिरसाट यांनी स्वतःच जाहीर केले. त्यानंतर संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर आगपाखड केली. इतकेच नव्हे तर शिरसाट पैशाने भरलेली बॅग शेजारी घेऊन शयन कक्षात बसले असल्याचा व्हिडिओ देखील त्यांनी प्रसिद्ध केला.
प्रथम शिरसाट यांनी या व्हिडिओतील बॅग पैशाने नव्हे तर कपड्यांनी भरलेली आहे, असा दावा केला होता. आता मात्र त्यांनी हा व्हिडिओ बोगस असल्याचा आरोप राऊत यांच्यावर केला आहे. आपण राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठविणार असून माफी न मागितल्यास त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येईल, असे शिरसाट यांनी सांगितले.
... तर पळता भुई थोडी होईल
यापुढे राऊत यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, अशी माझी भावना होत चालली आहे. मुंबई असो की पुणे, कुठे कुठे कोणत्या शासकीय बंगल्यात यांनी कशा पार्ट्या केल्या, याचे व्हिडिओ मला देखील प्रसिद्ध करावे लागतील. वास्तविक या खालच्या थराला जाण्याची माझी इच्छा नाही. मात्र, राऊत यांनी माझ्यावर गरळ ओकणे थांबविले नाही तर माझाही नाईलाज आहे. मग मात्र त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.