- राज्य
- या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही
या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही
पोलीस सह आयुक्त राजन कुमार शर्मा यांची महत्त्वपूर्ण घोषणा
पुणे: प्रतिनिधी
शहरातील 27 हजाराहून अधिक ढोल ताशा वादक ही सांस्कृतिक शक्ती असून तिचा उत्सव काळात विधायक वापर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात ढोल ताशा पथकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस सह आयुक्त राजनकुमार शर्मा यांनी दिली.
ढोल ताशा महासंघाने आयोजित केलेल्या वाद्यपूजन कार्यक्रमात शर्मा बोलत होते. यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या विभाग एकचे पोलीस उपायुक्तऋषिकेश रावळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, खजिनदार महेश सूर्यवंशी, कसबा गणपती ट्रस्टचे विश्वस्त विनायक ठकार आणि ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
रात्री 10 नंतर देखील ढोल ताशा पथकांचा सराव सुरू होत असल्याबद्दल सर्वाधिक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. त्यामुळे ढोल ताशा पथकांनी सरावाची सुरुवात लवकर करून रात्री दहा पूर्वी तो थांबविण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस सह आयुक्त शर्मा यांनी यावेळी ढोल ताशा पथकांना केले.
मागील वर्षीच्या गणेशोत्सवात आपण लेझर लाईटचा वापर न करता गणेशोत्सव साजरा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यावर्षीच्या गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळण्याचा आपला प्रयत्न असेल. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले.
यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त राहुल यावेळी बोलताना म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात कर्तव्य पार पाडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक असल्याचे अनेक वरिष्ठाकडून ऐकले आहे. मात्र, सर्व समाज घटकांच्या सहकार्याने उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
पुण्याची ढोल ताशा पथके सातासमुद्रापार
पुण्याच्या ढोल ताशा पथकांचा नावलौकिक जगभरात पसरला असून या पथकांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा अनेक देशातून निमंत्रणे मिळत आहेत. ढोल ताशा वादक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक दूत म्हणून कार्य करीत आहेत. जर आपल्याला डीजे विरहित गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर त्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा आहे. शालेय विद्यार्थ्यांना देखील घुंगरू काठी आणि टिपरी पथकाच्या माध्यमातून उत्सवात समाविष्ट करून घ्यावे, असे ठाकूर यांनी सांगितले.