- राज्य
- वादळी पावसामुळे शेकडो बोटी धक्क्यावर
वादळी पावसामुळे शेकडो बोटी धक्क्यावर
खोल समुद्रातील मासेमारीवर तात्पुरती बंदी, मच्छीमारांचे नुकसान
रत्नागिरी: प्रतिनिधी
शुक्रवारपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील विविध बंदरांमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या तब्बल अडीचशे बोटी धक्क्यावर लागल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
शुक्रवारपासून राज्यात, विशेषतः किनारपट्टीच्या भागात वादळी पाऊस सुरू आहे. राज्यभरात ही स्थिती 22 ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी न करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः यांत्रिक बोटींनी मासेमारी करणारे मच्छीमार अडचणीत सापडले आहेत.
माशांच्या विणीच्या काळात मासेमारीवर बंदी घातली जाते. परंपरेनुसार देखील पावसाळ्यात मासेमारी बंद ठेवून नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहून मासेमारीला सुरुवात केली जाते. त्यानुसार नारळी पौर्णिमेनंतर अनेक यांत्रिक बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. मात्र, वादळी पावसामुळे त्यांना परत यावे लागले आहे. राज्यातील जयगड, रत्नागिरी, दाभोळ, अलिबाग, रेवदंडा अशा अनेक बंदरांवर तब्बल 250 बोटी नांगर टाकून उभे आहेत.