- राज्य
- बार्टीमध्ये 'सूर्यप्रभा' चा प्रस्ताव केराच्या टोपलीत
बार्टीमध्ये 'सूर्यप्रभा' चा प्रस्ताव केराच्या टोपलीत
डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ग्रंथाची उपेक्षा
मुंबई : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे जीवन - कार्य आणि आठवणी कथन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांचा ' सूर्यप्रभा ' हा ग्रंथ खरेदी- वितरण करण्याबाबतचा प्रस्ताव बार्टीने केराच्या टोपलीत टाकून दिल्याचे उजेडात आले आहे.
तो प्रस्ताव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याच निर्देशानुसार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. त्यानंतर बार्टीसोबत झालेल्या बैठकांमध्ये आठवले यांनी त्यावर अनेकदा विचारणा करत निर्देश देवूनही वारे यांनी कोणतीही कार्यवाही आजवर केलेली नाही, अशी माहिती त्या ग्रंथाचे संपादक दिवाकर शेजवळ यांनी दिली आहे.
पँथर्स आणि डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे नाते हे माय - लेकरांचे होते. त्या पार्श्वभूमीवर, ' सूर्यप्रभा ' या ग्रंथाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वी दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवात खुद्द रामदास आठवले यांच्याच हस्ते मुंबईत झाले होते.
नामवंतांनी गौरवलेला ग्रंथ
' सूर्य प्रभा ' हा एकाच वेळी बहूमुखांतून डॉ. माईसाहेब आंबेडकर सांगणारा अपूर्व आणि अनोखा असा ग्रंथ आहे. त्याचा प्रख्यात विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. दत्ता भगत, अर्जुन डांगळे यांच्या सारख्या दिग्गजांनी आणि अनेक नामवंत पत्रकारांनी गौरव केलेला आहे. तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाने या ग्रंथाला ' हिंदुस्तान प्रकाशन ' चा पुरस्कार दिलेला आहे.