'हीच रेव्ह पार्टीची व्याख्या असेल तर कोणत्याही घरात...'

एकनाथ खडसे यांचा सरकार आणि पोलिसांना सवाल

'हीच रेव्ह पार्टीची व्याख्या असेल तर कोणत्याही घरात...'

जळगाव: प्रतिनिधी 

सात जणांच्या पार्टीत कोणतेही संगीत नव्हते, रोषणाई नव्हती, नृत्यही नव्हते. तरीही त्याला रेव्ह पार्टी म्हणायचे का, असा सवाल करतानाच खडसे यांनी, हीच जर रेव्ह पार्टीची व्याख्या असेल तर कोणत्याही घरात पाच सात माणसं जमली की त्याला रेव्ह पार्टी म्हणावे लागेल, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकार आणि पोलीस यांच्यावर टीका केली. 

मी कधी अंमली पदार्थ घेतले नाहीत तरीही...? 

मी आजपर्यंत कधीही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही. तरी माझ्यावर पोलिसांची पाळत का, असा सवाल खडसे यांनी केला. खडसे यांची पत्रकार परिषद सुरू असताना दोन पोलीस अधिकारी साध्या विषयात पत्रकार परिषदेत आले. याला खडसे यांनी आक्षेप घेतला. माझ्या घराच्या बाहेर देखील पोलीस उभे आहेत. ते काय माझ्या मानगुटीवर बसणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. 

हे पण वाचा  डीपीईएस मध्ये फुटबॉल स्पर्धा संपन्न

रेव्ह पार्टी हे ठरवून केलेले षडयंत्र

प्रांजल खेवलकर यांच्या पाळतीवर पोलीस आधीपासूनच होते. रेव्ह पार्टी हे ठरवून आपल्याला बदनाम करण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याचा आरोप करतानाच, आपली इतकी बदनामी करण्यामागचे नेमके कारण काय, असेही खडसे यांनी विचारले. 

कारवाईचे चित्रण आधीच बाहेर कसे आले? 

पोलिसांनी या कथित रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईचे चित्रण न्यायालयाला सादर करण्यापूर्वीच बाहेर कसे आले? कोणत्याही व्यक्तीचे खाजगी चित्रण जाहीर करता येत नाही. त्यातही महिला, मुलींचे चेहरे तर अजिबात जाहीर करता येत नाहीत. मात्र, या कारवाईच्या वेळी उपस्थित मुलींचे चेहरे चित्रणात दिसत आहेत. या मुलींपैकी एकीच्या पर्समध्ये अमली पदार्थ सापडल्याचे त्यात दिसत आहे आणि ते तिच्याकडे आले कसे, हे तिलाही माहीत नाही, असे खडसे म्हणाले. उपस्थितांपैकी दोघांनी मद्यप्राशन केल्याचेही समजल्याचे सांगण्यात आले. न्यायालयीन कारवाईपूर्वी ते कसे बाहेर माध्यमांपर्यंत आले, असेही खडसे यांनी विचारले आहे. पोर्शे प्रकरणात रक्तगट अहवाल बदलण्यासाठी बदनाम ससून रुग्णालयात अंमली पदार्थांचे अहवाल बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, असा संशय घेण्यास जागा असल्याचेही ते म्हणाले. 

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करणारा हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल्ल लोढा याच्या चौकशीची माहिती देण्याबाबत पोलीस ही तत्परता का दाखवत नाहीत? नाशिकच्या सेक्स स्कँडलमधील महिलेने अनेक आरोप केले आणि नंतर मागे घेतले. त्याबद्दल पोलीस का बोलत नाहीत? हा खडसे यांच्या बदनामीचा नियोजनबद्ध प्रयत्न आहे का? त्यांच्या जावयांनाच कसे वारंवार दाखवले जाते, अशा प्रश्नांची सरबत्ती खडसे यांनी केली. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt