- राज्य
- 'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'
'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज ठाकरे यांना खोचक सल्ला
सांगली: प्रतिनिधी
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या नावाखाली दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावे, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती आणि मराठी अस्मिता यांचा प्रश्न सध्याचा तापला असून त्यामुळे काही हिंसक प्रकारही घडले आहेत. मराठी विजय मेळाव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी त्याचे काही प्रमाणात समर्थन देखील केले आहे. या संदर्भात बोलताना आठवले यांनी ठाकरे यांना हा सल्ला दिला.
मराठी ही आपली भाषा आहे. मात्र, एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याची सक्ती करू नये. आपले मराठी बांधव देशाच्या विविध भागात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करून मनसेने भाषेच्या मुद्द्यावरून दादागिरी करू नये, असे आवाहन आठवले यांनी केले.