- राज्य
- '... तर पुन्हा माझ्याकडे न येता तिथूनच निघून जा'
'... तर पुन्हा माझ्याकडे न येता तिथूनच निघून जा'
अजित पवार यांनी दिली पक्षाच्या सर्वच मंत्री, आमदारांना तंबी
मुंबई: प्रतिनिधी
मंत्री आणि आमदार यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्ष बदनाम होत आहे. यापुढे कोणाकडून अशी चूक झाली तर पुन्हा माझ्याकडे येऊच नका. तिथूनच माघारी निघून जा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या मंडळींना सज्जड तंबी दिली आहे. मात्र, सर्वात वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.
अनेक लोकप्रतिनिधींची सध्याची बेशिस्त वागणूक बघता पवार यांनी आपले मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन त्यांची कडक शब्दात कानउघाडणी केली आहे.
विशेषत: शेतकरीविरोधी विधाने आणि अधिवेशन काळात सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने टीकेचे लक्ष्य असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पवार यांनी चांगलेच धारेवर धरले. कितीवेळा अशी विधानं खपवून घेणार आणि किती वेळा माफ करणार, असा सवाल त्यांनी कोकाटे यांना केला. त्यावर कोकाटे यांनी, यापुढे अशी चूक घडणार नाही अशी ग्वाही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर ते पडलेल्या चेहऱ्याने पवार यांच्या कक्षातून बाहेर पडले. मात्र, त्यामुळे उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार, खाते बदल करणार की अभय देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्यातूनच कोकाटे यांनी रमी प्रकरण घडल्यानंतरही, 'शेतकरी नाही सरकार भिकारी,' असे विधान करून मुख्यमंत्र्यांची नाराजी देखील ओढवून घेतली आहे. शिंदे गटाचे जेष्ठ मंत्री उदय सामंत यांनी देखील या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या सर्वच मंत्री व आमदारांना बेजबाबदार आणि बेशिस्त वर्तनामुळे व विधानांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे शक्यतो प्रसार माध्यमांशी बोलणे टाळाच. बोलावे लागले तर बोलताना आपल्या शब्दांचे भान ठेवा, असे सांगताना त्यांनी यापुढे, चुकीला माफी नाही, असेच जणू सूचित केले आहे.