- राज्य
- 'माझ्याही कुंकवाला न्याय द्या'
'माझ्याही कुंकवाला न्याय द्या'
महादेव मुंडे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
बीड: प्रतिनिधी
परळी येथील हत्या झालेली व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नसल्याचा निषेधार्थ मुंडे कुटुंबीय कमालीचे आक्रमक झाले असेल त्यातूनच आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार घडला आहे.
महादेव मुंडे यांची २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे, माझ्याही कुंकवाला न्याय द्या, असा टाहो फोडत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषप्राशन केले.
ज्ञानेश्वरी मुंडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी नेमके कोणते विषारी औषध प्राशन केले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तातडीचा उपाय म्हणून त्यांची रवानगी अतिदक्षता विभागात करण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मुंडे हत्या प्रकरणात तब्बल सात तपास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. तरीही तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. या प्रकरणी मुंडे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी, माझ्या कुंकवाला ही न्याय द्या, अशी मागणी केली होती. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संभाव्य दुर्घटना टाळली. पोलीस अधीक्षकांनी राज्य अन्वेषण विभागाकडून तपास केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.