- राज्य
- मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज
मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज
अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी साधला संपर्क
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी येथील पदाधिकारी बैठकीला बोलावणे न आल्यामुळे पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन हे नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि युवा नेते अमित ठाकरे यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून महाजन यांच्या नाराजीची कारणे समजून घेतली आहेत.
इगतपुरी येथे सुरू असलेल्या पक्षाच्या तीन दिवसांच्या निवडक पदाधिकारी बैठकीला महाजन यांना पाचारण करण्यात आले नाही. त्याबद्दलची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. मी इतर कोणावर नाही तर स्वतःवरच नाराज आहे. नाराजीच्या कारणाने आपण देव बदलणार नाही मात्र, देवाने बोलावल्याशिवाय जाणार देखील नाही, अशी स्पष्टोक्ती महाजन यांनी केली आहे. मनसेमध्ये दिवाळी आहे पण माझ्या घरी अंधार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
वरळी येथे झालेल्या मराठी विजय मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, असे सांगत राजकीय युतीचे संकेत दिले होते. राज ठाकरे यांचा मात्र त्याबाबत सावध पवित्रा आहे. त्यातच महाजन यांनी यावेळी राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, असे विधान केले होते. आजही दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशीच आपली भावना आहे. मात्र, त्यामुळे आपल्याबद्दल नाराजी असेल तर आपल्या विधानाबद्दल पक्षप्रमुखांची माफी देखील मागितली आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या बैठकीला न बोलावल्यामुळे आपल्या घरच्यांना देखील तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. मात्र, आपण पक्षासाठी भरीव काम केले. प्रवक्ता म्हणून जबाबदारी पार पाडली. या कामाबद्दल तरी पुढील काळात आपले नाव काढले जाईल, एवढेच एक समाधान आहे, असेही महाजन म्हणाले.