- राज्य
- शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती
शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची संयुक्त घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक नवीन युती आकाराला आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्यात युती झाल्याची अधिकृत घोषणा शिंदे आणि आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या सेना आहेत. शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालते तर रिपब्लिकन सेना ही घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचे चांगले जमेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री असताना देखील मी 'कॉमन मॅन' होतो. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आता मी डीसीएम म्हणजे 'डेडिकेटेड फॉर कॉमन मॅन' आहे. आनंदराज आंबेडकर हे देखील भारताची घटना तयार करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहेत. या संविधानामुळेच सर्वसामान्य माणूस मोठ्या पदावर पोहोचला. संविधानामुळेच मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्वसामान्य कुटुंबातून वर आले आणि पंतप्रधान झाले. आज संविधानामुळेच देशाचा कारभार सुरळीत सुरू आहे. दलित, शोषित यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.