- राज्य
- रस्त्यांच्या दुरवस्थेवर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी
रस्त्यांच्या दुरवस्थेवर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी
तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदार शेळके आक्रमक
रस्त्यांच्या दुरवस्थेवर मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक; तातडीने खड्डे बुजवण्याची सरकारकडे मागणी*
वडगाव मावळ प्रतिनिधी
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यावर आमदार सुनील शेळके यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाम भूमिका घेत निदर्शने केली. त्यांच्या सोबत आमदार बाबाजी काळे (खेड) व माऊली कटके (शिरूर) यांनी देखील सहभाग घेत रस्त्याच्या डागडुजीसाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, या रस्त्यांसाठी सुमारे ३२०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला किमान तीन ते चार महिने लागणार असून काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाईल. या दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईडपट्ट्यांचे मुरमीकरण करणे, आणि अपघात प्रवण ठिकाणी सूचना फलक लावणे ही तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेळके पुढे म्हणाले की, "दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या रस्त्यांवरून प्रवास करतात. अपुऱ्या देखरेखीतून अपघात होत असून कोणी जबाबदारी घेत नाही. केवळ मोठ्या टेंडर काढून सरकार जबाबदारी झटकत आहे, ही लोकांच्या जिवाशी थट्टा आहे."
निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी सांगितले की, या रस्त्यावर वर्षभरात दीडशेहून अधिक अपघात घडले असून अनेकांचे प्राण गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर ट्राफिक आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चाकण, शिक्रापूर आणि तळेगाव चौकात अनेक तास ट्राफिकमध्ये अडकून नागरिक त्रस्त झाले आहेत.
आमदार माऊली कटके यांनीही सांगितले की, हा रस्ता तळेगाव, चाकण व शिक्रापूर एमआयडीसी आणि मुंबईशी जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे. अरुंद रस्त्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. रिंगरोड आणि पर्यायी महामार्गांची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या तिघाही आमदारांनी सरकारला साकडे घालत सांगितले की, मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारे हे रस्ते असून, कामगार आणि शेतकरीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली जावीत.
शासन या तिघा आमदारांच्या ठाम भूमिकेला किती गांभीर्याने घेऊन पुढील कृती करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author
