- राज्य
- 'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?'
'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?'
विधान भवनात विरोधकांचे टॉवेल बनियन घालून आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी
चड्डी बनियन गॅंग हाय हाय, या गुंडाराज सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशी जोरदार घोषणाबाजी करत पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा निषेध केला. यावेळी विरोधी पक्षाचे आमदार टॉवेल आणि बनियान घालून आंदोलनस्थळी उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील आपल्या कक्षातून टॉवेल गुंडाळून बनियनवरच कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकारावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे.
आज सकाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू होतानाच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी टॉवेल आणि बनियन घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांच्या हाती असलेले संजय गायकवाड यांचे बॉक्सरच्या स्वरूपातील फलक लक्ष वेधून घेत होते.
एकीकडे संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून विरोधक सरकारला टीकेचे लक्ष्य करत असतानाच अधिवेशनाचा तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असून देखील अद्याप विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नाही. या मुद्द्यावरून देखील विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे.