- राज्य
- समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक
समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक
शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली पक्षाध्यक्ष पदाची सूत्र
मुंबई: प्रतिनिधी
तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवून समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक झाले. भावनेच्या भरात त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि काही काळ बोलणेही अशक्य झाले.
पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जयंत पाटील यांनी, आता नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. जयंत पाटील यांनी पदाची सूत्रे शिंदे यांच्याकडे सोपविली.
आपण सलग सात वर्ष निष्ठेने प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. पक्षाशी एकरूप होऊन काम केले. या या सात वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. या मागचा एकच उद्देश... असे म्हणतानाच जयंत पाटील यांचा कंठ दाटून आला. यावेळी पाटील समर्थकांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. पवार यांनी हात उंचावत कार्यकर्त्यांना शांत राहण्याची सूचना केली.
यानंतर बोलताना पाटील म्हणाले की, पक्षात काम करताना गट तट निर्माण करणे, वेगळ्या संघटना उभारणे, असे पाप आपण कधी केले नाही. अनेक वर्ष केवळ दोन खासदार असलेला भारतीय जनता पक्ष जर एवढा मोठा होऊ शकतो तर दहा-दहा आमदार, खासदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील मोठा पक्ष होऊ शकतो, हे सतत लक्षात ठेवून काम करावे, असे आवाहनही पाटील यांनी नेत्या, कार्यकर्त्यांना केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन वेगळी चूल मांडली त्यावेळी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्याबरोबर गेले. मात्र, जयंत पाटील शरद पवार यांच्याशी व पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. तरी देखील पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू राहिल्या. आजही त्या सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पहिल्या पाच महत्त्वाच्या विभागांपैकी एका विभागाचे मंत्रीपद मिळावे, यासाठी त्यांचा प्रवेश रखडला आहे, अशा चर्चा सुरू आहेत. आपण कितीही स्पष्टीकरण दिले तरी देखील या चर्चा सुरूच राहतात. त्यामुळे आपण याबाबत स्पष्टीकरण देण्याचे टाळतो, असे पाटील यांनी वारंवार सांगितले आहे.